प्रत्येकाला प्रश्न पडणे ही मानवी प्रवृत्ती – गजेंद्र सुरकार
प्रत्येकाला प्रश्न पडणे ही मानवी प्रवृत्ती – गजेंद्र सुरकार
अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा : वर्धा प्रश्न पडणे ही मानवी प्रवृत्ती असून, प्रश्न विचारण्याची सवय जिवंत राहिली तरच समाज वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारू शकतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, वर्धा यांच्या वतीने गोपुरी येथील केंद्रात १ ते ७ मे दरम्यान विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका बी.के. माधुरी दीदी होत्या. यावेळी बी.के. अपर्णा दीदी, बी.के. रेनु दीदी, बी.के. स्नेहा दीदी तसेच लोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा कोटेवार प्रमुख उपस्थित होत्या.
गजेंद्र सुरकार यांनी मानवाच्या आदिम संस्कृतीपासून विज्ञानाच्या प्रवासाचा संदर्भ देत सांगितले की, माणसाला पडलेल्या प्रश्नांमुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला. मात्र आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकजण अंधश्रद्धा, भीती, नशीब, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य यांच्या प्रभावाखाली बुवा-बाबांकडे आकर्षित होत आहेत.
“प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा,
असेच का तसेच का,
शिकणे कधी संपत नाही,
होऊ द्या लाख चुका,”
हे गीत विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेत त्यांनी निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग आणि प्रचिती यांचे महत्त्व पटवून दिले. विविध प्रात्यक्षिके आणि चमत्कारांचे प्रयोग सादर करत त्यांनी हातचलाखी, रासायनिक प्रक्रिया आणि विज्ञानाच्या नियमांमुळे तथाकथित चमत्कार घडत असल्याचे स्पष्ट केले.
जादूटोणा, करणी, भूत-प्रेत, मंत्र-तंत्र, कुंडली, ज्योतिष, ग्रहदोष यांसारख्या गोष्टी अंधश्रद्धेचा भाग असल्याचे सांगत “कोणीही खरे चमत्कार करू शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या ३६ वर्षांपासून चमत्कार सिद्ध करणाऱ्यांसाठी २५ लाख रुपयांचे खुले आव्हान दिले असून आजपर्यंत कोणीही ते स्वीकारले नसल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बी.के. माधुरी दीदी व सौ. सुषमा कोटेवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.के. अपर्णा दीदी यांनी केले, तर सूत्रसंचालन बी.के. रेनु दीदी यांनी केले. आभार प्रदर्शन बी.के. स्नेहा दीदी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.के. अविनाशभाई, बी.के. मधुदीदी, ऋषिकेश दिवटे, प्रणालीताई वादाफळे, श्वेताताई राऊत आदींनी परिश्रम घेतले.