नगराध्यक्ष चषक २०२६ : डॉक्टर संघ विजेता तर पत्रकार संघ उपविजेता
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:नगराध्यक्ष चषक २०२६ अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. अत्यंत रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात डॉक्टर संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकाविले, तर पत्रकार संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या छोटू साठे याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळ केल्याबद्दल विशाल तांड्रा याला मॅन ऑफ द सिरीज तसेच बेस्ट बॅट्समन पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सूरज कवाडे याला बेस्ट बॉलर पुरस्कार देण्यात आला, तर अजय रासेकर याने बेस्ट विकेटकीपर चा मान पटकाविला.
स्पर्धेत शिस्तबद्ध आणि क्रीडाभाव जपणाऱ्या डॉक्टर संघाला ‘फेअर प्ले टीम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला नगराध्यक्ष अलका वाढई अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, नगरसेवक निरज झाडे, अविनाश मट्टा, प्रणित सातपुते, नगर सेविका ॲड मेघा भाले, शिल्पाताई चुट्टे, वैष्णवी जुमडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे मंच संचालन शब्बीर अली, स्वच्छता निरीक्षक यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार यांनी मानले. स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे २ ते ३ संघ वगळता बहुतांश संघांनी आपल्या संघात व्यावसायिक खेळाडूंना संधी दिली होती.