वर्धा पोलीस दलाची ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ मोहिम

Fri 08-May-2026,10:32 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा पोलीस दलाची ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ मोहिम

पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर श्रमदान उपक्रम उत्साहात संपन्न

वर्धा | शहर प्रतिनिधी अमन नारायने

‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश देत वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभर विशेष श्रमदान मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते पोलीस अंमलदारांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छतेचा संकल्प प्रत्यक्ष कृतीतून साकारला.

या मोहिमेदरम्यान पोलीस मुख्यालय परिसर, शासकीय निवासस्थान परिसर, मोटार परिवहन विभाग (एम.टी. सेक्शन), आशीर्वाद मंगल कार्यालय परिसर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ पोलीस मुख्यालयापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्येही राबविण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदारांनी आपल्या परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली.

प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक उत्तरदायित्व जपत पोलीस अधीक्षक स्वतः या मोहिमेत सहभागी झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केल्याने पोलीस दलातील सांघिक भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

पोलीस दल हे २४ तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असते. कामाचे ठिकाण स्वच्छ व प्रसन्न असल्यास मानसिक तणाव कमी होऊन कामाचा उत्साह वाढतो. पोलीस विभाग हा समाजाचा आरसा असून, पोलीस स्वतः स्वच्छतेसाठी पुढाकार घेत असल्याने नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ हा उपक्रम केंद्र व राज्य शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानाला’ बळकटी देणारा ठरत असून, स्वच्छ परिसरामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांनाही सकारात्मक व प्रसन्न वातावरणाचा अनुभव मिळत आहे.

या श्रमदान मोहिमेत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, राखीव पोलीस निरीक्षक मजीद शेख यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.