अल्लीपूर पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश

Fri 08-May-2026,01:29 AM IST -07:00
Beach Activities

अल्लीपूर पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश

मुलीच्या आई-वडिलांकडून घेतले लेखी हमीपत्र

अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे व प्रशासनाच्या समन्वयातून एका नियोजित बालविवाहाला वेळीच आळा घालण्यात यश आले. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले असून परिसरात पोलिस व प्रशासनाच्या कार्याचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी देवळी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह २७ वर्षीय युवकासोबत होणार असल्याची माहिती अल्लीपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजयकुमार घुले यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ चाईल्ड लाईन व संबंधित प्रशासनाला कळविले.

यानंतर प्रशासनाची टीम व चाईल्ड लाईनचे पथक लग्नस्थळी पोहोचले असता तेथे विवाहाची तयारी सुरू असल्याचे आढळून आले. संबंधित कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली.

त्यानंतर वधूचे वय १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नाही, असे लेखी हमीपत्र मुलीच्या आई-वडिलांकडून घेण्यात आले. तसेच बालविवाह केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला. दोन्ही कुटुंबीयांनी बालविवाह न करण्याचे आश्वासन दिले.

या कारवाईत ठाणेदार विजयकुमार घुले, जमादार रवी वर्मा, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, शीतल घोडराव, संतोष ढोणे, वैभव भांदकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे, माजी सरपंच नितीन चांदनखेडे, इरफान पठाण, सुनीता नरड व एस. ढोबळे यांनी सहकार्य केले.

अल्लीपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक ११२ वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.