सावली तालुक्यात भीषण अपघात,२९ महिलांना घेऊन जाणारा ऑटो उलटला
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : सावली तालुक्यातील डोनाळा परिसरात आज भीषण अपघात घडला असून, सुमारे २९ महिलांना घेऊन जाणारा ऑटो रस्त्यावर पलटी झाल्याने सर्व महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तात्काळ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोनाळा येथील सुमारे २९ महिला लग्न समारंभासाठी कॅटरिंग काम करण्याकरिता सावली तालुक्यातील अंतरगाव येथे ऑटोने जात होत्या. दरम्यान, डोनाळा टर्निंगजवळ वाहनचालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने वाहन क्रमांक एमएच ३४ बीजी ५४९२ ऑटो अचानक पलटी झाला.
अपघात इतका भीषण होता की ऑटोमधील अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले व जखमींना त्वरित रुग्णालयात हलवले.
सर्व जखमी महिलांवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.