नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ वर्ध्यात संतप्त आंदोलन

Wed 06-May-2026,11:03 PM IST -07:00
Beach Activities

नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ वर्ध्यात संतप्त आंदोलन

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; महिला-बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

प्रतिनिधि : युसूफ पठाण वर्धा 

वर्धा वर्धा : नरसापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ वर्धा शहरात बुधवारी संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. या अमानुष घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून महिला व बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वर्धा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात दुपारी ४ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी आरोपीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा न झाल्यास समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महिलांनी हातातील बांगड्या दाखवत शासनाविरोधात निषेध नोंदविला. “महिलांची सुरक्षा कुठे आहे?” असा सवाल उपस्थित करत महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम कायदे, प्रभावी अंमलबजावणी आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनानंतर प्रतिनिधीमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

या आंदोलनात सौ. अरुणा प्रभाकरराव धोटे, संगीता उघडे, कल्पना टिपले, ऋतुजा भोयर, प्रमोद पांडे, प्रशांत सातपुते, भाग्यश्री उराडे, भारती कोटमकर, डॉ. अबुदय मेघे, कल्याणी पाटील, पियुष कोल्हे, माधवी पाटील, नाजिया शेख, शेख मेहमूद, प्रवीण पेठे, शंकर आडे, जयमाला सोनगडे, शेखर भाऊ शेंडे, प्रमोद भोमले, भारती थूल, मनोज देशमुख, विलास कोरले, नंदकुमार वानखेडे, कुणाल बावनकुळे, खुशाल राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

समाजात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला.