बल्लारपूरमध्ये तलवारीसह तरुण ताब्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

Wed 06-May-2026,04:43 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरातील गणपती विसर्जन घाट परिसरात विनापरवाना तलवार बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. स्वामी समय्या मेटपेल्ली (वय २५, रा. श्रीराम वॉर्ड, बल्लारपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्टच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई ४ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास केली.

पोलीस ठाणे बल्लारपूर चे पथक पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, गणपती विसर्जन घाट परिसरात एक इसम लोखंडी तलवार घेऊन फिरत आहे.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेतले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवून ठेवलेली लाल रंगाच्या म्यानमधील लोखंडी तलवार आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या तलवारीची एकूण लांबी सुमारे ६९ सें.मी. असून पात्याची लांबी ५८ सें.मी. व मुठीची लांबी ११ सें.मी. असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.

सदर आरोपीकडून तलवार जप्त करण्यात आला असून त्याने विनापरवाना शस्त्र बाळगून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड, पोहवा पंकज शिंदे, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं खंडेराव माने, लखन चव्हाण, शरदचंद्र कारूष यांनी केले.