वायगाव निपाणी येथे बालाजी फॅमिली रेस्टॉरंटवर पोलिसांची धडक कारवाई; 1.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

Wed 06-May-2026,10:45 PM IST -07:00
Beach Activities

वायगाव निपाणी येथे बालाजी फॅमिली रेस्टॉरंटवर पोलिसांची धडक कारवाई; 1.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

 

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन हद्दीतील वायगाव निपाणी येथील बालाजी फॅमिली रेस्टॉरंटवर धडक कारवाई करत अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश केला. या कारवाईत फ्रिजर, टेबल, खुर्च्या व इतर साहित्यांसह एकूण 1,56,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार 5 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित रेस्टॉरंटचा मालक किरण कामडी हा आपल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या देशी व विदेशी दारू विक्री करत असल्याची खात्री झाली. तसेच ग्राहकांना दारू पिण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती मिळाली.

पथकाने हॉटेलला चारही बाजूंनी घेराव घालून छापा टाकला असता, काउंटरवर एक अल्पवयीन मुलगा दारू विक्री करताना आढळला. हॉटेलमधील हॉलमध्ये तीन टेबलांवर एकूण 11 ग्राहक बसून दारू पिताना दिसले. त्यांच्यासाठी तीन नोकर सेवा देताना आढळून आले. झडतीदरम्यान देशी-विदेशी दारू व बिअर मिळून 19,950 रुपयांचा साठा, गल्ल्यातील 6,300 रुपये रोख रक्कम, 30,000 रुपयांचा डिप फ्रीजर, मोबाईल, प्लास्टिक ग्लास, 25 खुर्च्या, तीन टेबल आणि एका ग्राहकाची दुचाकी असा एकूण 1,56,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतल्यामुळे बालकामगार कायद्याखाली तसेच दारूबंदी कायद्यान्वये सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात हॉटेल मालक किरण कामडी व अन्य 17 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे इतर कर्मचारी सहभागी होते.

 

दरम्यान, अवैध दारू व अंमली पदार्थ विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.