बंगाली कॅम्प चौकात भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत सायकलस्वार महिलेचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
. चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौकात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सायकलवरून जाणाऱ्या एका महिलेचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोनी दुशंत पटेल (वय ३६), रा. छत्तीसगड ह. मु. चंद्रपूर असे मृतक महिलांचे नाव आहे.
मृतक महिला सोनी दुशंत पटेल या रोजगाराच्या शोधात सकाळी सायकलने जात असताना भरधाव ट्रक क्रं. एमएच ३४ बीजी ९९८६ ने त्यांना धडक दिली. धडकेनंतर त्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेनंतर चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बंगाली कॅम्प चौकात नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यातच भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.