वर्ध्यात अवैध पेट्रोल तस्करीचा पर्दाफाश; सवांगी मेघे पोलिसांची मोठी कारवाई
वर्ध्यात अवैध पेट्रोल तस्करीचा पर्दाफाश; सवांगी मेघे पोलिसांची मोठी कारवाई
४५० लिटर पेट्रोलसह बोलेरो पिकअप जप्त; तीन आरोपी अटकेत
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा जिल्ह्यातील सवांगी मेघे पोलिसांनी अवैधरित्या ज्वलनशील पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत ४५० लिटर पेट्रोलसह बोलेरो पिकअप जप्त केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून एकूण ५ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई ६ मे २०२६ रोजी रात्री करण्यात आली. सवांगी मेघे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन (MH 27 X 8523) दाहेगाव गावंडे येथून सलोद हिरापूर मार्गे वर्ध्याकडे अवैध पेट्रोल घेऊन जात होते.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित वाहनाला घेराव घालत थांबविले. वाहनाची तपासणी केली असता मागील भागात प्लास्टिकचे १५ मोठे डबे आढळले. त्यामध्ये सुमारे ४५० लिटर अवैध पेट्रोल साठवलेले होते.
या प्रकरणात पोलिसांनी विशाल दत्ताजी लखवाडे (वय ३१, क्षीरसमुद्रपूर), स्वप्निल आनंदराव सुरजुसे (वय ३१, येलाकेळी) व सचिन शंकरराव वानखेडे (वय ३४, येलाकेळी) यांना अटक केली आहे.
कारवाईदरम्यान ४६ हजार ८०० रुपयांचे पेट्रोल, ५ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन तसेच पेट्रोल काढण्यासाठी वापरण्यात येणारा ४० फूट लांबीचा पाइप असा एकूण ५ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन्ही आरोपींविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व एसडीपीओ प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज वाघोडे, नागेशकुमार चातरकर व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सचिन कनाडे करीत आहेत.