महागाईविरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Fri 15-May-2026,11:38 AM IST -07:00
Beach Activities

महागाईविरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

 

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा : वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने केंद्रातील बीजेपी सरकारच्या वाढत्या महागाईविरोधात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल तसेच दूधाच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, महिलांना घरगुती बजेट सांभाळताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

“बहोत हो गई महंगाई की मार” अशा घोषणांसह महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच दूधाच्या दरवाढीमुळे गृहिणींवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची टीका करण्यात आली.

महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले. सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात व्यस्त असून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

हे आंदोलन वर्धा शहरातील स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळील पेट्रोल पंपासमोर करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच पेट्रोल, डिझेल व दूध दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. अरुणा धोटे यांच्या नेतृत्वाखाली कमल डगवार, संगीता ठवळे, लता नंदरधने, दमयंती घोडमारे, ऋतुजा भोयर, दामिनी कुमरे, कल्याणी पाटील, वनिता मरसकोल्हे यांच्यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महागाई कमी करण्यासाठी सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.