समृद्धी महामार्गावर पाठलाग; 12.95 लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त
समृद्धी महामार्गावर पाठलाग; 12.95 लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त
वर्धा प्रतिनिधि युसूफ पठाण
वर्धा : शहर पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान धाडसी कारवाई करत समृद्धी महामार्गावरून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त केले. या कारवाईत फोर्ड इकोस्पोर्ट कारसह 36 पेट्या विदेशी दारू असा एकूण 12 लाख 95 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र वाहन चालक अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 15 मे रोजी पोलीस उपनिरीक्षक उमेश उगले हे पोलीस शिपाई अनिल चव्हाण व चालक पोलीस शिपाई आकाश कुंभारे यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत होते. त्यावेळी मुखबिरामार्फत जेल रोड परिसराकडे एक संशयित वाहन येत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष वर्धा कारागृह परिसरात सापळा रचून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पोस्ट ऑफिस चौक, डॉ. पंजाबराव देशमुख चौक, आरती चौक मार्गे नागपूर दिशेने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला.
सदर वाहन खडकी समोरील पुलाखालून सिंधी रेल्वेकडे जात असताना समृद्धी महामार्गावर विरुद्ध दिशेने वर्धेकडे परत येऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून अमगाव परिसरात वाहन गाठले असता चालकाने वाहन रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये विनापरवाना 36 पेट्या विदेशी दारू आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्ती पंचनामा करून फोर्ड इकोस्पोर्ट (क्रमांक एमएच 12 एनयू 3133) वाहनासह विदेशी दारू जप्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर व पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.