ड्रग्स, सट्टेबाजी व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करा; राष्ट्रीय बजरंग दलाचे एसपींना निवेदन
ड्रग्स, सट्टेबाजी व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करा; राष्ट्रीय बजरंग दलाचे एसपींना निवेदन
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा : शहरात सुरू असलेल्या कथित अवैध ड्रग्स व्यापार, क्रिकेट सट्टेबाजी व मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कचा पर्दाफाश करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात वर्धा शहरात शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. समता नगर येथील तन्मय भगत व त्याच्या आईने विद्यार्थ्यांच्या नावावर बँक खाती उघडून ती कथित क्रिकेट बुकी योगेश पंजवानी व इतर सट्टेबाजांना विकल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
तसेच वर्धा शहर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्याने या प्रकरणाला संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
राष्ट्रीय बजरंग दलाच्या निवेदनानुसार, आरोपी योगेश पंजवानी हा पूर्वी ऑनलाईन सट्टा चालवत होता व सध्या गोव्यातून क्रिकेट बुकीचे जाळे संचालित करीत असल्याचा आरोप आहे. दयालनगर परिसरातील संबंधितांनी मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती जमा केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
संघटनेने आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, अवैध संपत्ती जप्त करावी तसेच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जायसवाल, विभाग मंत्री सतीश शर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष साहिल परियाल, शहर कार्याध्यक्ष कपिल बैसवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.