दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक शाखेची विशेष मोहीम; १६ जणांवर कारवाई
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक शाखेची विशेष मोहीम; १६ जणांवर कारवाई
वर्धा | युसूफ पठाण
वर्धा : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.
ही मोहीम पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दि. २३ व २४ मे २०२६ रोजी जिल्हाभरात विशेष नाकाबंदी करून वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी मोटार वाहन कायद्यानुसार दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सेवाग्राम, आर्वी, कारंजा, पुलगाव तसेच वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित चालकांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.
वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली.