रामनगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कामगिरी; २ आरोपी अटकेत, २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mon 25-May-2026,11:09 PM IST -07:00
Beach Activities

रामनगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कामगिरी; २ आरोपी अटकेत, २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा | युसूफ पठाण

वर्धा : रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी प्रकरणाचा यशस्वी तपास करत रामनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून तब्बल २ लाख ५४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रामनगर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ४३४/२६ अंतर्गत कलम ३०५(अ), ३(५) बीएनएस-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, शास्त्री चौक परिसरातील त्यांच्या घरातून वापरातील सोन्याच्या बांगड्या व कानातील दागिने, अंदाजे ५ तोळे वजनाचे व सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे सोने चोरीस गेले होते. या प्रकरणात घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर संशय व्यक्त करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना रामनगर पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपींनी चोरीचे सोने सराफा दुकानात विकून त्यातून नवीन दागिने तयार करून घेतल्याचे तसेच काही रक्कम वैयक्तिक कामासाठी खर्च केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात पोलिसांनी ममता शिवमोहन शुक्ला (वय ४५, रा. सिंदी मेघे, वर्धा) व हर्षल विजयराव आटे (वय २६, रा. गौरक्षण वार्ड, वर्धा) यांना अटक केली आहे.

आरोपींकडून सोन्याचे २० मणी वजन ९६० मिग्रॅ. किमतीचे १४ हजार ४०० रुपये, सोन्याचे कानातील जोड वजन ३ ग्रॅम ७२० मिग्रॅ. किमतीचे ५५ हजार ८०० रुपये, चोरीच्या पैशातून खरेदी केलेला आयफोन प्रो मॅक्स किमतीचा १ लाख ४७ हजार रुपये तसेच ३७ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ५४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून नागरिकांनी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.