अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेची कारवाई; ५ हजारांचा दंड

Wed 27-May-2026,05:47 AM IST -07:00
Beach Activities

अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेची कारवाई; ५ हजारांचा दंड

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा : शहरातील बजाज चौक परिसरात वाहतूक शाखेकडून वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान अल्पवयीन मुलगा दुचाकी चालविताना आढळून आल्याने वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ मे २०२६ रोजी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धिरज पांडे व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जावेद शेख हे बजाज चौक येथे वाहतूक नियमनाची ड्युटी बजावत होते. त्यावेळी शुभम संदीप पाडे (वय १७, रा. मुरदगाव बेलसरे नागझरी, ता. देवळी, जि. वर्धा) हा एमएच-३२-एव्ही-७८५६ क्रमांकाची दुचाकी चालवत देवळीच्या दिशेने जाताना आढळला.

पोलिसांनी त्याला थांबवून वाहन परवाना व कागदपत्रांची चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच संबंधित दुचाकी दुसऱ्या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले.

यानंतर वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये ५ हजार रुपयांचा दंड आकारून पुढील कार्यवाही केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धिरज पांडे व जावेद शेख यांनी केली.