वृक्षांच्या संरक्षणासाठी वैद्यकीय जनजागृती मंचाचा पुढाकार

Sat 30-May-2026,05:18 AM IST -07:00
Beach Activities

वृक्षांच्या संरक्षणासाठी वैद्यकीय जनजागृती मंचाचा पुढाकार

झाडांच्या वाढीस अडथळा ठरणारे सिमेंट गट्टू हटविण्याची मागणी; नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा : शहरातील वृक्षांच्या संरक्षणासाठी वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत झाडांच्या खोडाभोवती बांधण्यात आलेले सिमेंटचे गट्टू हटविण्याची मागणी केली आहे. झाडांच्या नैसर्गिक वाढीस अडथळा ठरणाऱ्या या समस्येकडे मंचाने नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले असून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

शहरातील अनेक वृक्षांच्या खोडाभोवती पाण्याची जागा न ठेवता सिमेंटचे गट्टू बांधण्यात आले आहेत. काही ठिकाणी हे गट्टू झाडांच्या खोडाला घट्ट लागल्याने त्यांच्या वाढीवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे मंचाच्या निदर्शनास आले. यानंतर मंचाच्या सदस्यांनी शहरातील विविध भागांतील वृक्षांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून काही ठिकाणी झाडांना गुदमरविणारे गट्टू हटविण्याचा उपक्रम राबविला.

त्यानंतर नगर परिषद वर्धाचे अध्यक्ष सुधीर पांगुळ तसेच मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शहरातील सर्व वृक्षांभोवती वाढीस अडथळा ठरणारे गट्टू तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनाची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने विषयाचे गांभीर्य मान्य केले असून झाडांच्या खोडाला हानी पोहोचविणारे गट्टू लवकरात लवकर हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

वैद्यकीय जनजागृती मंचाने नगर परिषदेकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत केले असून पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक आरोग्य आणि हरित शहर निर्मितीसाठी प्रशासन व नागरिकांचा संयुक्त सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

यावेळी मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लावलेले वृक्ष निरोगीपणे वाढतील याची काळजी घेणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील वृक्षांभोवती अशा प्रकारचे गट्टू आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी आणि भविष्यात वृक्षांभोवती बांधकाम करताना आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.