कडक उन्हातही सेवेचा ध्यास; समाजसेविका भारतीताई यांची सलग दोन महिन्यांची जलसेवा

Mon 01-Jun-2026,06:50 AM IST -07:00
Beach Activities

कडक उन्हातही सेवेचा ध्यास; समाजसेविका भारतीताई यांची सलग दोन महिन्यांची जलसेवा

वर्धा | तालुका प्रतिनिधी इरशाद शहा

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत प्रवाशांना दिलासा मिळावा या उद्देशाने कायस्थ समाजाच्या वतीने सेवाग्राम रेल्वे स्थानकावर मागील चार वर्षांपासून शीतल जलसेवेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही २ एप्रिल २०२६ पासून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला असून, दुपारच्या वेळेत येणाऱ्या रेल्वेगाड्यांतील अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

या सेवाकार्यात अनेक समाजसेवक व स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र समाजसेविका भारतीताई यांनी २ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत सलग दररोज जलसेवा देत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. कडक उन्हाळा आणि प्रखर ऊन यांचाही त्यांच्या सेवाभावी वृत्तीवर कोणताही परिणाम झाला नाही.

भारतीताई यांनी यापूर्वी कोरोना महामारीच्या काळातही गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचे तसेच संसर्ग रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे कार्य केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या उपक्रमाला स्थानक व्यवस्थापक दुबे, डीआरयूसीसी सदस्य पत्तेवार, नेत्रा फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेत्राताई, वर्षा किटकुले, वैशालीताई तसेच भारती गुल्हाने यांचे सहकार्य लाभले. तसेच मंडल रेल्वे व्यवस्थापक गर्ग आणि वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक मित्तल यांचेही या जलसेवा उपक्रमासाठी विशेष योगदान लाभले आहे.