मेफेड्रॉन (एमडी ड्रग्स) तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
मेफेड्रॉन (एमडी ड्रग्स) तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा
वर्धा : वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत हिंगणघाट येथे मेफेड्रॉन (एमडी ड्रग्स) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली.
दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माऊली पार्क, संत तुकडोजी वार्ड परिसरात एनडीपीएस कायद्यान्वये छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान निखील मनोजराव रामनवार (२५), पियुष राजू मुसळे (२७), जय वसंतराव चुटे (२१) आणि कार्तिक वसंतराव हमंद (२९) हे संशयित घटनास्थळी आढळून आले.
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ, अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेली रोख रक्कम, सहा मोबाईल फोन तसेच टीव्हीएस ज्युपिटर (एमएच-३२-बीए-१४९४) ही दुचाकी जप्त करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी पियुष मुसळे हा जिल्ह्यातून हद्दपार असतानाही हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आला.
प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेला मेफेड्रॉन साठा हा चारही आरोपींच्या मालकीचा असून तो नागपूर येथील पंकज साठोणे याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जागीच जप्ती पंचनामा करण्यात आला.
या कारवाईत आरोपींकडून ५४ ग्रॅम ०५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एमडी ड्रग्स), ३२ हजार रुपये रोख रक्कम, सहा मोबाईल फोन व एक दुचाकी असा एकूण ४ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व पाच आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अंमली पदार्थांविरुद्धची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.