प्रामाणिकपणाचा आदर्श; सापडलेला महागडा मोबाईल मालकाला परत
प्रामाणिकपणाचा आदर्श; सापडलेला महागडा मोबाईल मालकाला परत
वर्धा, प्रतिनिधी / युसूफ पठाण : वर्ध्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा एका साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक विल्सन मोखाडे यांनी रस्त्यात सापडलेला सुमारे ४७ हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा स्मार्टफोन कोणताही मोह न बाळगता मूळ मालकाच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुरुवार, ४ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान विल्सन मोखाडे हे सेवाग्राम मार्गाने जात असताना जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्यावर एक मोबाईल फोन पडलेला आढळला. त्यांनी तत्काळ तो मोबाईल उचलून वर्धा शहर पोलीस ठाण्यात जमा केला व संपूर्ण माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.
पोलीसांनी मोबाईलमधील उपलब्ध माहितीच्या आधारे मालकाशी संपर्क साधला. काही वेळातच वर्धा जिल्ह्यातील नामवंत उद्योजक प्रदीप बजाज यांनी पोलीस ठाण्यात येऊन मोबाईल आपलाच असल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीसांनी मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केला.
महत्त्वाचा डेटा आणि महागडा मोबाईल सुरक्षित परत मिळाल्याने प्रदीप बजाज यांनी विल्सन मोखाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात हरविलेली मौल्यवान वस्तू परत मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत विल्सन मोखाडे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी हा समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. या घटनेमुळे प्रामाणिकपणा आणि माणुसकीची मूल्ये आजही जिवंत असल्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.