वायफड पारधी बेडा येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 8.69 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sat 20-Jun-2026,02:48 AM IST -07:00
Beach Activities

वायफड पारधी बेडा येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 8.69 लाखांचा मुद्देमाल जप्त

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा, दि. 19 जून : पुलगाव पोलिसांनी वायफड पारधी बेडा येथे अवैधरित्या गावठी मोहा दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 8 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींसह अन्य इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 18 जून रोजी वायफड पारधी बेडा परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी सरनेसिंग सरनाना चव्हाण, सुनील सरनाना चव्हाण, मुकेश रमेशराव भोसले, चरणसिंग परम भोसले, अजय गणेश पवार तसेच इतर काही इसम अवैध गावठी दारू निर्मिती करत असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच दारू भट्ट्या, जर्मन घमेले, लोखंडी ड्रम, 500 लिटर उकळता मोहा, 50 लिटर तयार गावठी दारू, 133 प्लास्टिक ड्रम तसेच 13 हजार 300 लिटर मोहा सडवा असा एकूण 8 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेले रसायन व तयार करण्यात आलेली गावठी दारू मानवी आरोग्यास घातक असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी आर्थिक फायद्यासाठी विषारी घटकांचा वापर करून मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करून विक्रीसाठी सज्ज करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 3(5) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन खांडेकर करीत आहेत.