एमडी ड्रग्जविरोधात वर्धा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत आरोपी अटकेत, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त
एमडी ड्रग्जविरोधात वर्धा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत आरोपी अटकेत, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एमडी (मॅफेड्रॉन) अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान 3.87 ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी), रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोनसह एकूण 51 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे 20 जून 2026 रोजी ईदगाह मैदान परिसरात एनडीपीएस कायद्यान्वये सापळा रचण्यात आला. यावेळी आनंदनगर येथील शेख अमीर शेख हमीद हा संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 3.87 ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी), 1 हजार 900 रुपये रोख रक्कम आणि दोन अँड्रॉईड मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 827/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ आनंदनगर येथील रोशन सहारे याचा असून त्याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आली. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंच, मापारी, फॉरेन्सिक पथक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.
या मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गजेंद्र धर्मे, प्रशांत वंजारी, महेंद्र पाटील, अभिजित वाघमारे, नितीन ईटकरे, श्रावण पवार, वैभव जाधव, रंजीत भुरसे आणि अमोल साळवन यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील एमडी अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.