अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ वर्ध्यात आक्रोश मोर्चा

Sat 18-Jul-2026,05:21 AM IST -07:00
Beach Activities

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ वर्ध्यात आक्रोश मोर्चा

वर्धा | प्रतिनिधी (युसूफ पठाण)

वर्धा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ शनिवारी (18 जुलै) वर्धा शहरात विविध सामाजिक संघटना, महिला, युवक आणि नागरिकांच्या सहभागातून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी चौक येथून झाली. त्यानंतर बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी सहभागी नागरिकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशा मागण्यांसह जोरदार घोषणाबाजी केली.

मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी शासन आणि प्रशासनाकडे केली.