दोन मुलांवर ब्लेडने वार, ८ वर्षीय मुलाचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
चंद्रपूर :शहरातील दुर्गापूर शक्तीनगर येथील वेकोलि वसाहतीत कौटुंबिक वादातून एका पित्याने आपल्या दोन मुलांच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची संतापजनक घटना सोमवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी घडली. या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेने शक्तीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
मंगेश भारत बदखल (४९) असे संशयित आरोपी पित्याचे नाव असून, देवांश मंगेश बदखल (८) असे मृत मुलाचे, तर रुद्रांश मंगेश बदखल (१२) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. जखमी रुद्रांशवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश बदखल हा शक्तीनगर येथील एम-२९ क्रमांकाच्या वेकोलि क्वार्टरमध्ये त्याचा लहान भाऊ राहुल याच्यासोबत राहत होता.
राहुल वेकोलिमध्ये कार्यरत आहे. मंगेश ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मंगेश व त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याने पत्नी मागील वर्षभरापासून त्याच्यापासून विभक्त राहत होती. मुलांच्या ताब्यावरूनही दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास मंगेश घरी आला. त्यानंतर त्याने आपल्या दोन्ही मुलांवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात देवांशच्या गळ्यावर गंभीर वार झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रुद्रांशही रक्तबंबाळ अवस्थेत गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर देवांशला मृत घोषित करण्यात आले. रुद्रांशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर आरोपी मंगेश घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर तुकूम तलाव परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, आरोपी मंगेश बदखल याच्याविरुद्ध २०२४ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याची परिस्थिती याबाबत दुर्गापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.