ज्ञानशक्ती सेवा फाऊंडेशनतर्फे सत्कार सोहळा व बहुभाषिक कवी संमेलन संपन्न

Sat 24-Jan-2026,02:15 AM IST -07:00
Beach Activities

नागपूर | मंगेश लोखंडे

ज्ञानशक्ती सेवा फाऊंडेशन, नागपूर यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सत्कार सोहळा व बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. परमानंद शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जरीना मंजिल, सज्जाद हुसेन बोहरा यांच्या निवासस्थानी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मजीद बेग मुगल शहजाद होते.

या साहित्यिक व सामाजिक कार्यक्रमात शिक्षण, साहित्य व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मजाज कुरैशी, नियाजुद्दीन सिद्दीकी, अब्दुल कादीर बख्श “अब्दुल”, प्रा. राजेश तेलंग, अॅड. इब्राहिम बख्श, दामोधर वानखेड़े, झाडे साहेब, लतिका बेलेकर, कविता अमिताभ बैस, प्रा. आरिफ काझी “जोश” (हिंगणघाटी), आम्रपाली पारवे, सलोनी मनोज तिवारी, अशोक जोशी, चंगेज खान तसेच सज्जाद हुसेन बोहरा यांचा समावेश होता. या सर्वांना डॉ. शांतिलाल कोचर “गोल्डी” यांच्या हस्ते अंगवस्त्र, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. शांतिलाल कोचर “गोल्डी” यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कवी संमेलन पार पडले. हिंदी, उर्दू व मराठी भाषेतील कवींनी देशभक्ती, सामाजिक एकता व मानवता या विषयांवर आधारित कविता सादर केल्या. उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात कवींचे उत्स्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दामोधर वानखेड़े यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक अॅड. अब्दुल अमानी कुरेशी यांनी उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमींचे आभार मानले.