वर्धा जिल्हा परिषद प्रशासनाचा मुजोरपणा उघड; न्यायासाठी 16 दिवसांचे आंदोलन, भीम आर्मीचा 26 जानेवारीला आत्मदहनाचा इशारा
वर्धा जिल्हा विशष प्रतिनिधि युसूफ पठाण
वर्धा जिल्हा परिषद कार्यालयासमोर रत्नमाला मेंढे या न्यायाच्या मागणीसाठी गेल्या 16 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करीत आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या असंवेदनशील व बेजबाबदार भूमिकेमुळे अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन डोळेझाक करत असल्याने लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या अन्यायाविरोधात भीम आर्मीने थेट इशारा देत आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसांत रत्नमाला मेंढे यांना न्याय न मिळाल्यास, भीम आर्मीचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे.
प्रदीप कांबळे म्हणाले,
“प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही जर एका पीडित महिलेला न्याय मिळत नसेल, तर तो संविधानाचा सरळसरळ अपमान आहे. भीम आर्मी हा अन्याय सहन करणार नाही.”
या इशाऱ्यामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाने काही अनुचित घडण्यापूर्वी तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी भीम आर्मी व विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.