मूर्तीजापूर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नचिकेत बोटकुलेची कांस्यपदकावर मोहोर

Sat 24-Jan-2026,05:06 AM IST -07:00
Beach Activities

मुख्य संपादक नावेद पठाण

 

मूर्तीजापूर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नचिकेत बोटकुलेची कांस्यपदकावर मोहोर

वर्धा :मूर्तीजापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत वर्धा येथील नामांकित बजाज कॉलेज ऑफ सायन्सचा खेळाडू नचिकेत श्रीरामजी बोटकुले याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २० ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नचिकेतने १९ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात तसेच ९० किलोवरील (+९० किलो) सुपर हेवीवेट वजनगटात अटीतटीच्या लढती खेळून हे यश संपादन केले.

संपूर्ण स्पर्धेदरम्यान नचिकेतने आपल्या शारीरिक क्षमतेसोबतच तांत्रिक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. त्याच्या या यशामागे प्रशिक्षक श्री. वासुदेव वरहारे व श्री. महावीर वरहारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका योगिता तागडे यांनी त्याला स्पर्धेसाठी विशेष प्रोत्साहन दिले.

नचिकेतच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा या महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग तसेच मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करण्याचा निर्धार नचिकेतने व्यक्त केला आहे.