विकसित भारत राज्यस्तरीय युवा संसदेसाठी अभि थुटे यांची निवड; दिल्ली संसदेत सहभागाची संधी
विकसित भारत राज्यस्तरीय युवा संसदेसाठी अभि थुटे यांची निवड; दिल्ली संसदेत सहभागाची संधी
हिंगणघाट (निखिल ठाकरे): युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील १८ ते २५ वयोगटातील नोंदणीकृत युवकांसाठी ‘युवा संसद’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
‘विकसित भारत’ या संकल्पनेअंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय युवा संसदेत ‘आणिबाणीची ५० वर्षे : भारतीय लोकशाहीसाठी धडे’ हा चर्चेचा विषय होता. जिल्हास्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पाच स्पर्धकांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली असून, राज्यस्तरीय विजेत्यांना दिल्ली येथील संसद भवनात सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.
सावरखेडा येथील अभि थुटे यांनी तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेत असूनही त्यांनी जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरापर्यंत मजल मारली, ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
अभि यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सरस्वती विद्यालय, पाईकमारी येथे पूर्ण केले. त्यांच्या यशामागे शिक्षक तुकाराम पांढरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी अभि यांना सातत्याने योग्य दिशा व प्रेरणा दिली. पुढील शिक्षणासाठी अभि नागपूर येथे शिक्षण घेत आहेत.
या यशाबद्दल परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे सावरखेडा गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभि यांनी आपल्या या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. तसेच श्री. पांढरे, श्री. नागरे, श्री. दोंदल, श्री. साळवे, पाटोले, निमजे, बुटले, जवादे आणि सरस्वती विद्यालय, पाईकमारीचे मुख्याध्यापक श्री. चंद्रशेखर निमट यांनी माजी विद्यार्थी अभि थुटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.