निर्मल बेकरी चौकात मद्यधुंद चालकावर पोलिसांची कठोर कारवाई

Sat 28-Feb-2026,12:57 PM IST -07:00
Beach Activities

निर्मल बेकरी चौकात मद्यधुंद चालकावर पोलिसांची कठोर कारवाई

रक्तात 130 मि.ग्रॅ. अल्कोहोल आढळले; दुचाकी जप्त, आरोपी अटकेत

वर्धा (जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण): होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरात वाहतूक पोलिसांनी तपासणी मोहीम कडक केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल बेकरी चौक येथे विशेष वाहन तपासणी अभियान राबविण्यात आले.

तपासणीदरम्यान एक दुचाकी चालक भरधाव व असंतुलित पद्धतीने वाहन चालविताना आढळला. पोलिसांनी तत्काळ त्याला अडवून चौकशी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्याच्या तोंडातून मद्याचा तीव्र वास येत होता.

वैद्यकीय तपासणीत चालकाच्या रक्तात 130 मि.ग्रॅ. अल्कोहोल आढळून आले. त्यानंतर वर्धा शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली. त्याची दुचाकी (एमएच 32 एफ 4245) जप्त करण्यात आली आहे.

आरोपीची माहिती :

नाव – वैभव गजानन श्रीरामे

वय – 35 वर्षे

रा. कुरझडी (जामठा), वर्धा

कारवाई करणारे पथक :

एएसआय संजय भांडेकर, पोलीस हवालदार प्रदीप कोहळे, महिला पोलीस कर्मचारी दर्शना वानखेडे व वैशाली लेंडे यांनी सायंकाळी 6 वाजता ही कारवाई केली.

सणांच्या काळात विशेष खबरदारी

पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, होळी व रंगपंचमीच्या काळात मद्यपान करून वाहन चालवू नये. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सुरक्षित वाहनचालक बना – एक चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते.