ग्रामीण रुग्णालयासमोरून दुचाकीची धाडसी चोरी,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Fri 24-Apr-2026,10:20 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर : शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

राजा जीवन खोटे (४८), रा. दादमहल वार्ड, जेलच्या मागे, चंद्रपूर हे ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. ते रोजप्रमाणे २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आपल्या एम.एच.३४ बी.क्यू. ०१३८ (होंडा युनिकॉर्न) या दुचाकीने कामावर आले होते. त्यांनी वाहन दवाखान्याच्या कार्यालयासमोर उभे करून आत साफसफाईच्या कामात व्यस्त झाले.

दरम्यान, सुमारे १०.२० वाजताच्या सुमारास ते बाहेर आले असता त्यांची दुचाकी जागेवरून गायब झाल्याचे लक्षात आले

त्यांनी तत्काळ रुग्णालय परिसर, बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच ओळखीच्या व्यक्तीकडे शोध घेतला; मात्र वाहनाचा काहीच मागोवा लागला नाही.

चोरीस गेलेली दुचाकी पर्पल-काळ्या रंगाची असून तिची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत खोटे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण करीत आहेत.