महाराष्ट्र दिनी बल्लारपुरात ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा

Fri 01-May-2026,10:10 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपुर:पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकांपासून प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जिद्दीने कार्यरत असलेल्या बल्लारपूर येथील श्रमिक पत्रकारांचा तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध जयंती या तिहेरी औचित्य साधत हा कार्यक्रम शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बल्लारपुर येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर भूषविणार असून, पत्रकारितेतील त्यांच्या दीर्घ अनुभवातून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमात बल्लारपूर शहरातील विविध वृत्तपत्रांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या आणि सातत्याने समाजहिताचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यामध्ये एजाज अली (सहसंपादक, नवभारत), सुरेश वर्मा (सहसंपादक, दैनिक भास्कर), नारदप्रसाद ठाकुर (संपादक, दैनिक लोकवारा), प्रशांत विघ्नेश्वर (जिल्हा प्रतिनिधी, नवराष्ट्र) यांचा समावेश आहे. तसेच विशेष कामगिरी करणारे पत्रकार म्हणून देवेंद्र आर्य (तालुका प्रतिनिधी, नवभारत व उपाध्यक्ष, नगर परिषद बल्लारपुर) आणि अजय दुबे (तालुका प्रतिनिधी, दैनिक भास्कर तसेच कामगार नेते) यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून पत्रकारांमध्ये परस्पर संवाद वाढण्यास आणि नवोदितांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.