वर्धा पोलिस दलाचा गौरव: २ अधिकारी व ४ अंमलदारांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

Fri 01-May-2026,04:45 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा पोलिस दलाचा गौरव: २ अधिकारी व ४ अंमलदारांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

 

प्रतिनिधि इरशाद शाह वर्धा 

वर्धा : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना दरवर्षी पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. सन २०२५ साठी जाहीर झालेल्या या अत्यंत मानाच्या ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DGP Insignia) पदकासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलातील ०२ अधिकारी व ०४ अंमलदारांची निवड झाली आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, वर्धा जिल्ह्यातील पुढील अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सपोनि श्री. मंगेश भोयर (पोलीस स्टेशन तळेगाव), उपनिरीक्षक श्री. अमोल लगड (वाहतूक शाखा, वर्धा), सफौ. श्री. भारत पिसुडे (हायवे ट्रॅफिक), पोहवा. श्री. दिनेश बोथकर (सायबर पोलीस स्टेशन), सफी. श्री. सतीश दरवरे (पोलीस स्टेशन देवळी) व मपोशि. सुनैना डोंगरे (पोलीस मुख्यालय, वर्धा) यांचा समावेश आहे.

सदर सन्मानार्थींनी आपल्या कार्यकाळात गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन, क्लिष्ट तांत्रिक तपास तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

दरम्यान, दिनांक ०१ मे २०२६ रोजी सकाळी ०८.०० वाजता मा. पालक मंत्री श्री. पंकज भोयर यांच्या हस्ते या सर्व सन्मानार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या राजपत्रानुसार, राष्ट्रपती पदकप्राप्त तसेच विविध प्रवर्गात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. या गौरवामुळे वर्धा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून, इतर कर्मचाऱ्यांनाही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.