बोगस रासायनिक खताचा साठा उघड; शेतकऱ्यांची लूट उघडकीस

Mon 04-May-2026,11:57 PM IST -07:00
Beach Activities

बोगस रासायनिक खताचा साठा उघड; शेतकऱ्यांची लूट उघडकीस

वर्धा | पुलगाव प्रतिनिधी (युसूफ पठाण)

पुलगावजवळील नाचणगाव येथे बोगस रासायनिक खताचा साठा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका घरात मोठ्या प्रमाणात बनावट खतांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती समोर येताच सामाजिक सेवक सतीश बोरसे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

रमाई बुद्ध विहारालगत असलेल्या एका घरात सुमारे 300 ते 400 बॅगा रासायनिक खताचा साठा आढळून आला. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, संबंधित साठ्यास कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.

आधीच नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणे व रासायनिक खतांच्या माध्यमातून लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. संबंधितांकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले.

नाचणगाव व इंजाळा येथील गोडाऊनमधून एकूण 723 बोगस खताच्या बॅगा आढळून आल्या असून, या बॅगा नाचणगाव येथे ममता मून यांच्या नावावर आंबेकर यांच्या गोडाऊनमध्ये उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याबाबत कृषी विभागालाही कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.

या प्रकरणी सामाजिक सेवक सतीश बोरसे पाटील व शेतकरी बांधवांनी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, कृषी अधिकारी संदीप ढोणे (जिल्हा परिषद वर्धा), प्रमोद पेटकर (जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक), राजेंद्र आंबुलकर व महेश पालवे (तालुका गुणनियंत्रण, देवळी) यांच्या पथकाने संबंधित गोडाऊनवर सील मारून पुढील कारवाईसाठी खताचे नमुने जप्त केले आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की, अशा संशयास्पद खताच्या बॅगा कृषी केंद्रात आढळल्यास शेतकऱ्यांनी त्या खरेदी करू नयेत व तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे.