वडनेर ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा जुन्या सदस्यांकडे; प्रशासक समिती स्थापन, कविता वानखेडे यांनी स्वीकारली जबाबदारी
वडनेर ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा जुन्या सदस्यांकडे; प्रशासक समिती स्थापन, कविता वानखेडे यांनी स्वीकारली जबाबदारी
वडनेर प्रतिनिधी : नाज़िम खान
वडनेर : उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार वडनेर ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा जुन्या सदस्यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासक समितीची स्थापना करण्यात आली असून सरपंच कविता वानखेडे यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
नवीन ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर होईपर्यंत जुने सदस्य आणि प्रशासक समिती ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार सांभाळणार आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल घडून आले असून गावाच्या विकासाची जबाबदारी पुन्हा जुन्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासक कविता वानखेडे यांनी गावातील रखडलेली विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावातील मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाकडून नवीन निवडणुकांच्या तारखा जाहीर होईपर्यंत ग्रामपंचायतीचा प्रशासकीय तसेच विकासविषयक कारभार सुरळीतपणे सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या घडामोडींमुळे वडनेर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांचे लक्ष आता निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.