दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; स्विफ्ट डिझायर वाहन जप्त

Fri 12-Jun-2026,09:33 PM IST -07:00
Beach Activities

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकावर कारवाई; स्विफ्ट डिझायर वाहन जप्त

वर्धा इरशाद शाह : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी व वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वर्धा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या एका चारचाकी चालकावर कारवाई करून वाहन जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. यावेळी वर्धा शहरातील मार्शल पेट्रोलिंगदरम्यान बजाज चौक येथे वाहनांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान एमएच-31-डीव्ही-7461 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारचा चालक अब्दुल अनीस अब्दुल सत्तार (वय 42, रा. शास्त्रीनगर, यवतमाळ) हा दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आला. त्याला वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणून ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली असता त्याच्या शरीरात 175.2 मिलीग्रॅम अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले.

याप्रकरणी चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्यासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), यवतमाळ यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, सन 2026 मध्ये आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या 152 कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय 50 वाहनचालकांच्या परवान्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध 1,386 कारवाया तर अवैध प्रवासी वाहतुकीच्या 96 प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली आहे.

दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांना केले आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.