जी.एस. कॉमर्स कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सची सैन्यात भरारी
जी.एस. कॉमर्स कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सची सैन्यात भरारी
चार जण अग्निवीरमध्ये, दोघांची पॅरा स्पेशल फोर्स कमांडो म्हणून निवड
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण शिक्षण मंडळ संचलित जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स, वर्धा (स्वायत्त संस्था) च्या एनसीसी विभागाने वर्ष २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत महाविद्यालयातील चार एनसीसी कॅडेट्सची अंतिम निवड झाली असून त्यापैकी दोन कॅडेट्सची प्रतिष्ठित पॅरा स्पेशल फोर्स (Para SF) कमांडो पदासाठी निवड झाल्याने महाविद्यालयासह जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
नागपूर आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस (ARO) अंतर्गत पार पडलेल्या भरती प्रक्रियेत कॅडेट सिद्धांत अजय परिमल (बी.कॉम. प्रथम वर्ष) व कॅडेट सूरज शेषराव जाधव (बी.कॉम. द्वितीय वर्ष) यांची भारतीय सैन्याच्या अत्यंत खडतर आणि प्रतिष्ठेच्या पॅरा स्पेशल फोर्स कमांडो पदासाठी निवड झाली आहे.
तसेच कॅडेट अनुप जी. जांभुळे (बीसीसीए द्वितीय वर्ष) व कॅडेट दर्शन गणेश बावने (बी.कॉम. प्रथम वर्ष) यांची अग्निवीर भारतीय सैन्यात निवड झाली असून ते प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सैन्यात नियुक्ती करण्यात येणार आहे.
या यशामागे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून दिले जाणारे शिस्तबद्ध प्रशिक्षण, विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय शिबिरांमधील सहभाग तसेच एनसीसी प्रमाणपत्र परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरी महत्त्वाची ठरली. निवड झालेल्या कॅडेट्सनी प्री-रिपब्लिक डे कॅम्प (Pre-RDC), सीएटीसी (CATC) आदी प्रतिष्ठित शिबिरांमध्ये सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली होती.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षण मंडळाचे सभापती संजय भार्गव यांचे प्रोत्साहन, प्राचार्या डॉ. अरुंधती निनावे यांचे नेतृत्व तसेच एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. प्रवीण ठाकरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले.
महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटने ‘सेवा परमो धर्म’ या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श निर्माण करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सर्व कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल लष्करी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.