कंत्राटी कनिष्ठ लेखापाल सचिन बेले यांना सेवेत पुन्हा रुजू करण्याची मागणी

Thu 11-Jun-2026,05:03 AM IST -07:00
Beach Activities

कंत्राटी कनिष्ठ लेखापाल सचिन बेले यांना सेवेत पुन्हा रुजू करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा वर्धा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वर्धा विभागात कंत्राटी कनिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या सचिन बेले यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, सचिन बेले हे गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वर्धा कार्यालयात कंत्राटी कनिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत होते. त्यांची नियुक्ती एस-टू इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, मुंबई या कंत्राटी कंपनीमार्फत करण्यात आली होती. संबंधित कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर एमआरसीएस प्रा. लि., मुंबई या नव्या कंपनीला कंत्राट देण्यात आले.

यापूर्वी कंत्राटी कंपनी बदलल्यानंतर जुन्या कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीत सामावून घेण्याची पद्धत होती. मात्र, इतर कर्मचाऱ्यांना कामावर घेतले असताना सचिन बेले यांना अद्यापही सेवेत रुजू करून घेण्यात आले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

सचिन बेले यांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम केल्याचे स्थानिक सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी शिफारस पत्राद्वारे नमूद केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांना हेतुपुरस्सर सेवेतून वगळण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

सचिन बेले यांच्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असून त्यांचे वडील दृष्टिहीन आहेत, तर आई हृदयविकाराने आजारी आहे. याशिवाय त्यांना आठ वर्षांची मुलगी असून वयाच्या ४२ व्या वर्षी दोन महिन्यांपासून ते बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सचिन बेले यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना तातडीने सेवेत पुन्हा रुजू करून न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.