संत पैकाजी महाराज सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
संत पैकाजी महाराज सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
वर्धा : इरशाद शाह / संत पैकाजी महाराज सेवा समिती, वर्धा (वांढेकर कुणबी समाज) यांच्या वतीने माँ भगवती अनुसया माता सेलिब्रेशन हॉल, नालवाडी येथे इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व गुणगौरव सोहळा-२०२६ उत्साहात पार पडला.
"प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत. कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी," हा संदेश कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत पैकाजी महाराज, समाजभूषण स्व. विनायकराव चौधरी तथा संस्थापक अध्यक्ष स्व. रा. म. धोटे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेखिका व कवयित्री सौ. रूपाताई कोकाटे (नागपूर) होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन पावडे (संस्थापक अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच), कु. यशश्री बुरांडे (एमबीए, आयआयएम इंदौर), श्री. शुभम तमगिरे (अकॅडमी हेड, एनडीए) तसेच संत पैकाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष श्री. गुरुदेव चौधरी उपस्थित होते. मान्यवरांचे शाल, सन्मानचिन्ह व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समितीच्या वतीने "एक विद्यार्थी – एक झाड" हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना झाड, डॉक्युमेंट फोल्डर, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, रोख पारितोषिक तसेच मनोबल, फिटे अंधाराचे जाळे, मोहोर आणि ब्रह्ममार्ग या चार पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातील देणगीदारांच्या वतीने रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, करिअर व व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जीवनातील अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व मनोगते व्यक्त केली.
समितीचे अध्यक्ष श्री. गुरुदेव चौधरी यांनी प्रास्ताविकातून सेवा समितीने गेल्या बारा वर्षांत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रितीताई बाळसराफ व श्री. प्रवीणराव चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. श्रीकांत धोटे यांनी केले.
कार्यक्रमासाठी चहा, नाश्ता, भोजन तसेच उत्तम बैठक व्यवस्थेची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संत पैकाजी महाराज सेवा समितीचे सर्व कोअर कमिटी सदस्य व समाजबांधवांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक तसेच समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.