सिख बेडा परिसरात वर्धा पोलिसांची मोठी कारवाई; ७ अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त, १८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
सिख बेडा परिसरात वर्धा पोलिसांची मोठी कारवाई; ७ अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त, १८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
झडतीदरम्यान धारदार चाकू आढळल्याने स्वतंत्र गुन्हा दाखल
वर्धा प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, अंमली पदार्थांची तस्करी तसेच अवैध शस्त्रास्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वर्धा पोलिसांनी रविवारी पहाटे सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिख बेडा परिसरात ‘ऑपरेशन वॉशआऊट’ राबवून मोठी कारवाई केली. या कारवाईत ७ अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून १८ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच झडतीदरम्यान एका संशयिताच्या घरातून धारदार चाकू आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना सिख बेडा परिसरात अवैध दारूनिर्मिती, अवैध व्यवसाय तसेच शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), सावंगी (मेघे) पोलीस ठाणे आणि दंगा नियंत्रण पथकाला संयुक्त विशेष शोध व स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने ८ जून २०२६ रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पंचांच्या उपस्थितीत सिख बेडा परिसरातील संशयित व्यक्तींच्या घरांची आणि परिसराची कसून झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान गावठी मोहाची दारू तयार करणाऱ्या ७ अवैध दारूभट्ट्यांचा पर्दाफाश करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत ७ स्वतंत्र गुन्हे नोंदवून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत एकूण १८ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून उर्वरित अवैध साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
दरम्यान, झडती मोहिमेदरम्यान एका संशयिताच्या घरातून मोठा धारदार चाकू जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
७७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग
ही विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी दंगा नियंत्रण पथकासह एकूण ७७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी तसेच सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी, सावंगी (मेघे) पोलीस ठाणे आणि दंगा नियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.
अवैध व्यवसायांवर कारवाई सुरूच राहणार
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी इशारा देताना सांगितले की, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, अंमली पदार्थांची तस्करी तसेच अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी भविष्यातही अशा विशेष शोध व स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत.