देवली पोलिसांची मोठी कारवाई; 115 गुन्ह्यांतील 11.16 लाखांची अवैध दारू रोड रोलरखाली नष्ट

Thu 11-Jun-2026,05:11 AM IST -07:00
Beach Activities

देवली पोलिसांची मोठी कारवाई; 115 गुन्ह्यांतील 11.16 लाखांची अवैध दारू रोड रोलरखाली नष्ट

देवली युसूफ पठाण : वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा असल्याने अवैध दारूविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने देवली पोलीस ठाण्याने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तब्बल 11 लाख 16 हजार 260 रुपयांची देशी व विदेशी दारू न्यायालयाच्या आदेशानुसार रोड रोलरखाली नष्ट केली.

देवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2021 पासून आतापर्यंत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अवैध दारूचा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार 11 जून 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये 101 गुन्ह्यांमधील 5 हजार 416 देशी व विदेशी दारूच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत 8 लाख 62 हजार 60 रुपये आहे, तसेच 14 गुन्ह्यांमधील 1 हजार 980 बाटल्या, ज्यांची किंमत 2 लाख 54 हजार 200 रुपये आहे, असा एकूण 115 गुन्ह्यांतील 7 हजार 396 बाटल्यांचा व 11 लाख 16 हजार 260 रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. हा संपूर्ण मुद्देमाल रोड रोलरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला.

ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पंचांच्या उपस्थितीत पार पडली. अवैध दारूविरोधातील मोहिमेतील ही एक महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात असून, दारू तस्करी व अवैध विक्री करणाऱ्यांना यामुळे मोठा इशारा मिळाला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, वर्धा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वर्धा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये देवली पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि. संदीप कापडे, पोउपनि. अश्विन गजभिये, पोहवा/1375 विमलनयन तिवारी, पोहवा/809 गणेश खेवले, पोशी/310 संदीप वाघमारे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक डी. वाय. राऊत, आर. यू. काश्ते व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.