रोजगारासाठी तेलंगणात गेलेल्या सिंदेवाही तालुक्यातील चार मजुरांचा भीषण अपघातात मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर: पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील चार मजुरांचा बुधवारी ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात २० हून अधिक मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर वेमुलवाडा आणि वारंगल येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये माय-लेकीचा समावेश असल्याने सिंदेवाही तालुक्यातील पवना चक आणि नागभीड तालुक्यातील वाघोला गावांवर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील काही मजूर रोजगाराच्या अभावामुळे तेलंगणा राज्यातील एका गावात धान लागवडीच्या कामासाठी गेले होते.
सलग तीन दिवस काम पूर्ण केल्यानंतर बुधवारी सायंकाळी ते टाटा एस वाहनातून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी परतत होते. त्यावेळी तेलंगणा राज्यातील अनुपुरम गावाजवळ राज्य परिवहन (एसटी) बसने टाटा एस वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टाटा एस वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात चार मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने वेमुलवाडा तसेच वारंगल येथील शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातात अतुल अशोक सोनुले (वय ३६), अर्चना जनार्दन सोनुले (वय ३६), रंजना प्रभाकर शेंडे (वय ४५), सर्व रा. पवना चक, ता. सिंदेवाही तसेच प्रभा सीताराम मोहुरले (वय ५६), रा. वाघोला, ता. नागभीड यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे अर्चना जनार्दन सोनुले आणि प्रभा सीताराम मोहुरले या माय-लेकी होत्या. दोघींचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पवना चक आणि वाघोला गावात शोकमय वातावरण असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
ग्रामीण भागात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे अनेक मजुरांना उपजीविकेसाठी परराज्यात स्थलांतर करावे लागत आहे. या घटनेनंतर स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शासनाने परराज्यात कामासाठी जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे