जूनोना–चंद्रपूर मार्गावर दुचाकी अपघात,उपचारासाठी निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sat 25-Jul-2026,05:03 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: जूनोना – चंद्रपूर मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात जूनोना येथील सुरज नरेंद्र नंदाराम ३४ वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज नरेंद्र नंदाराम यांची प्रकृती बिघडल्याने ते २४ जुलै रोजी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच-३४-सीएफ-५४१० वरून बाबूपेठ (चंद्रपूर) येथील दवाखान्यात उपचारासाठी निघाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी त्यांचा शोध सुरू केला.

शनिवारी सकाळी शोध घेत असताना जूनोना–चंद्रपूर मार्गावर रस्त्याच्या कडेला सुरज नंदाराम हे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती तातडीने बल्लारपूर पोलीस ठाण्याला देण्यात आली.

प्राथमिक अंदाजानुसार, रात्रीच्या वेळी वाहन चालविताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याखाली घसरून अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव चव्हाण व पोलीस हवालदार दिनकर धोबे करीत आहे