नीट पेपरफुटी व विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वसमत कडकडीत बंद,उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Thu 23-Jul-2026,07:00 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथे आज दिल्लीतील नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. त्याच अनुषंगाने वसमत शहरात कडकडीत बंद पाळून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नीट परीक्षा पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला असून, या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीतील सर्व सूत्रधार, दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय उपचार व आर्थिक मदत द्यावी, तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

या बंदला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. आंदोलनात तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत स्वामी, जिल्हा समन्वयक मुकुंद करवंदे, शीलरत्न खंदारे, रुपेश कदम, उत्तम मामा करवंदे, ज्येष्ठ नेते भाई रमेश भुजबळ, महिला जिल्हाध्यक्षा प्रभावती खंदारे, इर्शाद पठाण, राहुल करवंदे, नरहरी कोकरे, प्रवीण बाराहाते, राजरत्न गायकवाड, सिद्धार्थ खंदारे, भीमराव सरोदे, कल्पना भुकतर, रमाबाई गोंदे, लताबाई इंगोले, पंचफुला नरवाडे, रमेश गायवासरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.