भरधाव ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील महादेव मोहल्ल्यात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव मालवाहू ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृत चिमुकलीचे नाव श्रीजा महेश गहाणे वय अडीच वर्षे असे आहे. रविवारी १९ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास श्रीजा घरासमोर खेळत होती. खेळता-खेळता ती वडिलांकडे जाण्यासाठी रस्त्यावर आली. त्याचवेळी साबणाचा माल घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू ई-रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. चालकाचे चिमुकलीकडे लक्ष न गेल्याने हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
धडक इतकी जोरदार होती की श्रीजाचा जागीच मृत्यू झाला.
वडिलांच्या डोळ्यांसमोरच मुलीचा मृत्यू झाल्याने गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर गावात संबंधित ई-रिक्षा सिंदेवाही येथील एका साबण एजन्सीचा असून तो लाडबोरी येथील प्रेम नारायण चहांदे चालवत असल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. वाहनाचा क्रमांक तसेच चालकाची ओळख निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत चिमुकलीचे शवविच्छेदन सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील भरधाव वाहतुकीवर नियंत्रण आणावे, निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम व सिंदेवाही पोलीस करीत आहेत.