रोठा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे न्यायाची मागणी; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचीही विशेष चर्चा
रोठा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे न्यायाची मागणी; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचीही विशेष चर्चा
विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती आणि जलदगती सुनावणीसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध
मुंबई/वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील १२ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात प्रभावीपणे घेण्यात यावी आणि खटल्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रोठा प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा केली. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि दोषी आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच खटल्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्यासह प्रकरणाची सुनावणी जलदगतीने होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यातील मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अशा अमानवीय गुन्ह्यांतील दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे रोठा प्रकरणातील न्यायप्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.