खा. अमर काळे यांची वडुरा येथे शेट्टे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
खा. अमर काळे यांची वडुरा येथे शेट्टे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
अमरावती | प्रतिनिधी (वर्धा : युसूफ पठाण)
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वडुरा येथे भेट देत दिवंगत मधुकरराव गोविंदराव शेट्टे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच शेट्टे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या.
दिवंगत मधुकरराव शेट्टे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच वडुरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबतच त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विकास शेट्टे पुढे नेत आहेत.
यावेळी खासदार अमर काळे यांनी दिवंगत मधुकरराव शेट्टे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विकास शेट्टे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देत या दुःखद प्रसंगी पक्ष व समाज त्यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त केली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत मधुकरराव शेट्टे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व लोकाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.