चंद्रपूर पोलिसांचा जनजागृती रथ सेवेत,सायबर,महिला व बाल सुरक्षेचा संदेश आता थेट जनतेपर्यंत
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, बाल संरक्षण, व्यसनमुक्ती आणि वाहतूक नियमांबाबत व्यापक जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या नावीन्यपूर्ण जनजागृती रथाचा भव्य शुभारंभ नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या विशेष संकल्पनेतून साकारण्यात आलेला हा जनजागृती रथ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात फिरून विविध सुरक्षा विषयांवर दृक्-श्राव्य माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांकडून समाजाशी थेट संवाद साधत जनजागृती अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
जनजागृती रथाद्वारे सायबर गुन्ह्यांपासून बचाव, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, ओटीपी स्कॅम, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आदी विषयांवर माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, तरुणांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश, पोक्सो कायद्याअंतर्गत बालकांचे संरक्षण, गुड टच-बॅड टचची माहिती, महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध कायदेशीर अधिकार आणि उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, वाहतूक नियमांचे महत्त्व आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यावर आधारित लघुपटांचे प्रदर्शनही या रथाद्वारे केले जाणार आहे.
या जनजागृती रथात ६५ इंची एलईडी स्क्रीन, उच्च क्षमतेची साऊंड सिस्टीम, आकर्षक दृक्-श्राव्य सादरीकरणाची सुविधा उपलब्ध असून बाजारपेठा, मुख्य चौक, शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
कम्युनिटी पोलिसिंगला बळकटी देत नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाइनचा प्रभावी वापर, तसेच क्यूआर कोड स्कॅन करून चंद्रपूर पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलशी जोडण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले.
या उपक्रमामुळे सुरक्षा विषयक माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून सायबर गुन्हे, महिला व बाल अत्याचार तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी जनसहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.