सेवाग्राम रुग्णालयातील रात्रीच्या इमरजेंसी सेवांचा गोंधळ; रुग्ण रेफर करूनही डॉक्टर अनुपस्थित असल्याचा आरोप

Sat 24-Jan-2026,11:43 PM IST -07:00
Beach Activities

सेवाग्राम रुग्णालयातील रात्रीच्या इमरजेंसी सेवांचा गोंधळ; रुग्ण रेफर करूनही डॉक्टर अनुपस्थित असल्याचा आरोप

सेवाग्राम | वर्धा तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा

सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (MGIMS) रुग्णालयात रात्रीच्या वेळेत दिल्या जाणाऱ्या इमरजेंसी सेवांबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून, रुग्णांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री सुमारे १०.१५ वाजता एका रुग्णाला इमरजेंसी वॉर्डमधून मेडिसिन वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये रेफर करण्यात आले होते.

मात्र, रुग्ण वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये दाखल झाल्यानंतर त्या वेळेस ड्युटीवर असलेले डॉक्टर प्रत्यक्षात अनुपस्थित असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. वॉर्डमध्ये उपस्थित असलेला अटेन्डंट झोपेत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला असून, डॉक्टरांना तातडीने बोलावण्यासाठी किंवा आवश्यक उपचार सुरू करण्यासाठी कोणतीही त्वरित कार्यवाही करण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या कालावधीत केवळ उपस्थितीची नोंद घेण्यात आली; मात्र रुग्णाच्या प्रकृतीकडे उपचाराच्या दृष्टीने वेळेत लक्ष दिले गेले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. 

संबंधित रुग्ण व्हीलचेअरवर असल्याने उपचारात झालेल्या विलंबामुळे त्याच्या प्रकृतीत अधिक अडचणी निर्माण झाल्याचे नातेवाईकांनी नमूद केले.

इमरजेंसी वॉर्डमधून रुग्ण रेफर केल्यानंतरही पुढील वॉर्डमध्ये डॉक्टरांची अनुपस्थिती, अटेन्डंटकडून योग्य प्रतिसाद न मिळणे तसेच उपचारात झालेला विलंब यामुळे रुग्णालयातील रात्रीच्या इमरजेंसी व्यवस्थेची गंभीर पोलखोल झाल्याचे चित्र आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून रात्रीच्या ड्युटीवरील डॉक्टरांची उपलब्धता, अटेन्डंटची जबाबदारी तसेच इमरजेंसी रेफरल प्रक्रियेतील त्रुटींवर तातडीने कारवाई करावी, अशी ठाम मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.