संविधानाची माहिती असणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य : इमरान राही

Mon 09-Mar-2026,11:04 PM IST -07:00
Beach Activities

संविधानाची माहिती असणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य : इमरान राही

कोळोणा (चोरे) येथे महिला मिलन व परिसंवाद कार्यक्रम संपन्न

नावेद पठाण मुख्य संपादक 

कोळोणा (चोरे) : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. सुमारे ७४ वर्षांपूर्वी लागू झालेल्या भारतीय संविधानाने लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक व सांस्कृतिक समान हक्क तसेच राष्ट्रीय एकता या मूल्यांना भक्कम आधार दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून संविधानाची मूलभूत माहिती प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रभावना बळकट करणाऱ्या संविधानातील विविध कायदेशीर तरतुदींची माहिती ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे पहिले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही यांनी केले.

ते कोळोणा (चोरे) येथील कलिंग बुद्ध विहारात ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित महिला मिलन व परिसंवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेविका प्रा. नूतन माळवी, प्रा. सविता घोडे, प्रबोधनकार पद्माकर कांबळे, दिलीप वैघ, कविता भस्मे तसेच पोलीस पाटील दीक्षा मुनेश्वर प्रमुख उपस्थित होते.

प्रा. नूतन माळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, युवक व विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांची ओळख करून देणारा हा उपक्रम समता सैनिक दलाने स्तुत्य पद्धतीने आयोजित केला आहे. प्रा. सविता घोडे यांनीही आजच्या पिढीतील मुले व युवकांना सक्षम व कर्तव्यनिष्ठ भारतीय नागरिक म्हणून घडविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांच्या हस्ते उपस्थितांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम भस्मे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीक्षा मुनेश्वर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निर्मला ओंकार, कविता भस्मे, संगीता मुनेश्वर, सुजाता भस्मे, प्रेमिला रवाईकर, अवंतिका भस्मे, ललिता येसनकर, रेखा ओंकार, मंदा वाघमारे, गोदावरी पाटील, लोचना नगराळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.