इतवारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य लंगर व मिष्टान्न वाटप
इतवारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य लंगर व मिष्टान्न वाटप
वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण
वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वर्धा शहरातील इतवारा चौक येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मंडळा’च्या वतीने भव्य लंगर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
या प्रसंगी आयोजित लंगरमध्ये नागरिकांना मसाला भात, आईस्क्रीम, लाडू, चॉकलेट, मठ्ठा तसेच भाजी-पुरी अशा विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. सकाळपासूनच इतवारा चौक परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला व उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सामाजिक एकतेचा संदेश
हा उपक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक एकता, सेवा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. महाप्रसाद व मिठाई वाटपातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उत्साही व प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.
विशेष सहकार्य
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज लाबाने, अहमद पठाण, राहुल कांबळे, बंडू फुलमाळी, दीपक निकलेकर, संदीप नगराळे, प्रशांत रामटेके तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले. नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
आयोजक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मंडळ, वर्धा